ताज्या बातम्या
अमळनेर | लोकमन न्यूज :
आज रोजी लोकमन न्यूजकडे अमळनेर तालुक्यातील निंब गावातील एका जागृत नागरिकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून जवळच्या शहरी भागातील काही भरकटलेले तरुण व तरुणी, शहरी भागात पोलीस प्रशासन व दामिनी पथकाकडून होत असलेल्या कडक कारवाईमुळे आपला मोर्चा निंब–कपिलेश्वरपरिसराकडे वळवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर तरुण-तरुणी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान या परिसरात थांबून गैरवर्तन करत असल्याने गावातील महिला, शालेय मुली तसेच विद्यार्थिनींवर याचा दूरगामी मानसिक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर नंदादीप माध्यमिक विद्यालय असल्याने शाळकरी मुलांच्या कोवळ्या मनावर याचा विपरीत परिणाम होण्याची गंभीर शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर निंब गावातील नागरिक व तरुण मंडळींनी पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली असून, आजपासून असे भरकटलेले तरुण-तरुणी आढळून आल्यास त्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिस प्रशासनाची भूमिका स्पष्ट
या संदर्भात लोकमन न्यूजने सहाय्यक पोलीस निरीक्षक मारवड श्री. जिभाऊ सो. पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की,
“शहरी भागापासून ते मारवड परिसरापर्यंत अशा भरकटलेल्या तरुण-तरुणींवर विविध स्वरूपात कारवाई करण्यात आलेली आहे. आजपासून मारवड ते कपिलेश्वर परिसरात दामिनी पथक आणि मी स्वतः गस्त घालून कडक कारवाई करणार आहोत.”
यावेळी त्यांनी पालकांनाही आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करत,
“पालकांनी वेळेत लक्ष दिल्यास असे प्रकार रोखता येतील,”
असे स्पष्ट केले.
गावकऱ्यांची एकजूट, प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन
निंब गावातील जागृत नागरिक, तरुण मंडळी व पालकांनी एकत्र येत महिलांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य यासाठी ठाम भूमिका घेतली असून, पोलिस प्रशासनाकडूनही तातडीच्या कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात या परिसरात अशा प्रकारांवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

शहरी भागातील कारवाई नंतर भरकटलेले तरुण ,तरुणींचा निंब कपिलेश्वर परिसरात सुळसुळाट ; गावकऱ्यांची तक्रार
लोकमन न्यूज..अनिल चौधरी ९/२/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
