महाराष्ट्र
लोकमन न्यूज़ अनिल चौधरी निंब अमळनेर महाराष्ट्र उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. मात्र भगर खाल्ल्यामुळे अन्नविषबाधा झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्हा येथे घडलेल्या आहेत. त्यामुळे उपवासात भगर खाताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार भगरीवर अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. या बुरशीमुळे फ्युमिगाक्लेविनसारखी विषारी द्रव्ये तयार होतात. दमट व ओलसर वातावरण बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्याने अशा परिस्थितीत साठवलेली किंवा खराब झालेली भगर खाल्ल्यास अन्नविषबाधा होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो.
भगर खाताना नागरिकांनी घ्यावयाची काळजी
बाजारातून भगर आणल्यानंतर ती नीट निवडून व स्वच्छ करूनच वापरावी. शक्यतो पॅकबंद, ब्रँडेड आणि लेबल असलेलीच भगर खरेदी करावी. लेबल नसलेली, सूटी किंवा अनधिकृत भगर घेऊ नये. पॅकेटवरील पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासणे अत्यावश्यक आहे.
भगर साठवताना ती स्वच्छ, कोरड्या जागी व झाकणबंद डब्यात ठेवावी, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नये तसेच जुनी भगर खाऊ नये. शक्यतो तयार पीठ विकत घेणे टाळावे, कारण पिठामध्ये ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असल्याने बुरशी लागण्याचा धोका वाढतो.
उपवासात भगरीची भाकरी किंवा धपाटे खाण्याऐवजी खिचडीसारखे हलके पदार्थ घेणे अधिक सुरक्षित ठरते. आवश्यक तेवढेच पीठ दळून घ्यावे आणि तेही जास्त दिवस साठवू नये. बाहेरून दळून आणण्यापेक्षा घरीच दळणे सुरक्षित मानले जाते.
तसेच भगर व शेंगदाणे हे प्रथिनयुक्त पदार्थ असल्याने सलग दोन-तीन दिवस उपवास करताना त्यांचे अतिसेवन अॅसिडीटी वाढवू शकते. यामुळे उलटी, मळमळ व पोटदुखीचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे पचनशक्ती लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणातच भगरीचे सेवन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
भगर विक्रेत्यांसाठी सूचना
विक्रेत्यांनी केवळ पॅकबंद भगरीचीच विक्री करावी. भगर खरेदी करताना धाऊक विक्रेत्याकडून पावती घेणे बंधनकारक आहे. मुदतबाह्य भगर किंवा भगर पीठ विक्रीस ठेवू नये. पॅकेट किंवा पोत्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक स्पष्ट असल्याची खात्री करूनच विक्री करावी. सूटी भगर किंवा खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेवू नये.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

उपवासात भगर खाताना सावध राहा; बुरशीजन्य अन्नविषबाधेचा धोका
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १४/२/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
