प्रतिनिधी..लोकमन् न्यूज. निंब अमळनेर..: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. २९) त्यांच्या कर्मभूमी असलेल्या बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत 'दादां'ना अखेरचा निरोप दिला जाईल. राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी असा तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी प्रशासनाकडून बारामती येथे युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळी ९ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला गदीमा सभागृहापासून सुरुवात होईल. ही अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान चौक, भिगवण रोड सेवा रस्ता मराठी शाळेच्या गेटने विद्या प्रतिष्ठानच्या गेटवर पोहोचेल. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अंतिम दर्शनासाठी गर्दी; दिग्गजांची उपस्थिती अपेक्षित
अजित दादांच्या निधनाने संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. काल (दि. २८) सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे सर्वसामान्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हजारो नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. आजच्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बारामतीत उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
"अजित दादांचे निधन महाराष्ट्रासाठी कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण करणारे आहे. त्यांच्या निधनाने राज्याने एक कार्यक्षम नेता गमावला आहे."
बारामतीत शोकाकुल वातावरण, व्यवहार बंद
राज्याच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अजित पवार यांच्या निधनाने त्यांची कर्मभूमी बारामती पुरती हेलावली आहे. संपूर्ण बारामती शहरात शोकाकुल वातावरण असून, त्यांना श्रद्धांजली म्हणून आज सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. दादांच्या अकाली जाण्याने बारामतीच्या जनतेवर शोककळा पसरली आहे.
राज्यव्यापी दुखवटा जाहीर
दरम्यान, राज्य सरकारने अजित पवार यांच्या निधनानंतर २८ ते ३० जानेवारी अशा तीन दिवसांच्या राज्यव्यापी दुखवट्याची घोषणा केली आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. तसेच, या तीन दिवसांच्या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या विकासाचे एक पर्व संपले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.



